ऊन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान | उन्हाळी/लेट रब्बी सोयाबीन पेरणी नियोजन | Summer Soyabin Seed Production

 

ऊन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान

शेतकरी बंधुनो, आपणास उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन बद्दल बरेच प्रश्न उद्भवत असतील जसे की

ü                         उन्हाळी सोयाबीन साठी लागणारे हवामान कसे हवे?

ü                          उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन साठी कोणते वाण निवडावे?

ü                          पेरणी कधी करावी म्हणजेच पेरणीची वेळ?

ü                          बिजप्रक्रिया, खतांचे नियोजन, पाण्याचे नियोजन, पीक संरक्षण करिता फवारणी कोणती करावी?

ü                          उन्हाळी सोयाबीन घेतले तर एकरी उत्पादन किती होईल?

तर ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण खाली सविस्तर मांडलेले आहे.

शेतकरी मित्रांनो, ऊन्हाळी सोयाबीनचे बिजोत्पादन घेवून पुढील खरीप हंगामाकरीता दर्जेदार बियाणे उत्पादन करण्यासाठी खालील सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब नक्की करावा.

ऊन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनासाठी आवश्यक बाबी खालीलप्रमाणे:

जमीन:  ऊन्हाळी सोयाबीन साठी मध्यम ते भारी जमीन अवश्यक, जमीनित सेंद्रीय खताची मात्रा चांगली आसावी.

हवामान: सोयाबीन सुर्यप्रकाशास संवेदनशील पिक आहे. समशितोष्ण हवामान अनुकुल असते. ऊन्हाळी हंगामात पिकाची कायीक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्‍यता असते. सोयाबीन २२-३० अंश सेल्सीअस तपमानात चांगले येते. परंतु कमाल तापमान ३५ सेल्सीअसपेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात. शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो तसेच उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. तपमान १0 सेल्सीअस पेक्षा डिसेंबर महिन्यात कमी झाल्यास पेरणी करू नये. सर्वसाधारण तापमान १५ सेल्सीअस किंवा त्यापुढे असल्यास पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास बियाण्याची उगवण होण्यास १0-१२ दिवस लागतात. 

सोयाबीन वाण :  MAUS-612, MAUS-162, MAUS-71, MAUS-१५८, केडीएस-753, केडीएस-726 ह्या वाणांची निवड उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन करिता करू शकता.

जमीनीची पूर्व मशागत: जमीनीची नांगरणी करून विरूध्द दिशेने मोगडणी व नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी.

बीज प्रक्रिया: शेतकरी मित्रांनो, किड व रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो किंवा मिश्र उत्पादन कार्बोक्झीन ३७.५% + थायरम ३७.५% (व्हिटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाण्यास राझोबीयम जिवाणू खत ब्रॅडी रायझोबियम + स्फुदर विरघळणारे जिवाणू खत (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १0 किलो किंवा १०० मिली प्रति १० किलो ग्रॅम याची बीज प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ :  उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन करिता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पेरणीची वेळ कोणती?, तर शेतकरी मित्रांनो डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करणे अत्यावश्यक आहे. बिजोत्पादनासाठी सदर कालावधीत पेरणी शक्‍य असल्यासच बिजोत्पादन कार्यक्रम घ्यावा.

लागवडीचे अंतर व पध्दत : सोयाबीनची पेरणी ४५ x ५ सेंमी अंतरावर व २.५ ते ३ सेमी खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थितत उगवण होत नाही.

बियाण्याचे प्रमाण :  एकरी २२-२६ किलो प्रमाणे वापरावे. (किंवा हेक्‍टरी-६५ किलो)

कंपोस्ट खत :  हेक्‍टरी २0 गाड्या (५ टन) जमिनीत टाकुन चांगले मिसळून घ्यावे.

रासायनिक खते: शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला खतांचे नियोजन ही योग्य पद्धतीने करावे लागेल. तर, हेक्टरी नत्र: स्फुरदः पालाश ची मात्रा ३0:६०:३० + २० किलो गंधक पेरणीच्या वेळी द्यावे. खत बियाण्याच्याखाली पडेल अशा रितीने पेरणी करावी, बियाण्याचा व खताचा संपर्क येवू नये. झिंक सल्फेट २५ किलो बोरॉक्स १० किलो हेक्‍टरी देण्यात यावे. नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियमण गंधक, कॅल्शीयम, मोलीब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त, मॅग्नीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी अवश्यक असतात. पिकास पाण्याचा ताण/खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

पेरणीनंतर नत्रयुक्त (युरिया) खताचा वापर टाळावा. पिक २०-२५ दिवसाचे आसताना पिवळे पडल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याची  (मायक्रोला ग्रेड ) ५०-७५ मीली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत आसताना १९:१९:१९ या द्रवरूप रासायनिक खताची १0 मिली प्रति १0 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ०0:५२:३४ या द्रवरूप रासायनिक खताची १0० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

अंतरमशागत: पिक २0 ते ३५ दिवसाचे असताना दोन कोळपण्या १५-२0 दिवसानी पहिली व ३0-३५ दिवसानी दुसरी व एक निंदणी (खुरपन) करून शेत तणविरहीत ठेवण्यात यावे. सोयाबीनला फुलं लागल्यानंतर अंतरमशागत करू नये, अन्यथा मुळे तुटून उत्पन्नात घट येते.

पाण्याचे नियोजन :

1.      पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी.

2.      पेरणीनंतर ५ दिवसानी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे.

3.       जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात १0-१२ दिवसाच्या च्या अंतराने पाणी द्यावे.

4.      मार्च व एप्रिल महिन्यात ८-१० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

5.      सोयाबीन पिक रोपाच्या, फुलोऱ्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत संवेदनशिल आसल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे. शेतात पाणी साचू देवू नये.

6.      एकुण पिक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणता जमीनीच्या मग्दुराप्रमाणे  ८-१0 पाणी पाळ्याची अवश्यकता आहे.

भेसळ काढणे : सोयाबीन बिजोत्पादन प्लॉट पिकामध्ये झाडाची उंची (उंच), झाड पानांचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणावरून भेसळ ओळखुन बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या तपासणीपूर्वी काढून क्षेत्र भेसळ विरहीत ठेवण्यात यावे.

पीक संरक्षण : उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी, वाटण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. सदर किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५0० ईसी (२० मिली) किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन ४.९ सी.एस. (६ मिली) किंवा थायमिथोक्झाम १२.६०% + लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी ( २.५ मिली) किंवा क्लोरट्रानिलीप्रोल १८.५ एस सी (३ मिली) या किटकनाशकांचा वापर करावा. सदर किटकनाशकांचे प्रमाण हे १० लीटर पाणी (साधा पंप) यासाठी असून पॉवर स्प्रे साठी किटकनाशकाची मात्रा तीनपट करावी.

उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही; परंतू , येलो व्हेन मोझेक या विषाणू रोगाचा प्रादर्भाव होण्याची शक्‍यता असते. प्रादर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावी. पांढर्‍्यामाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढऱ्यामाशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी थायमिथोक्झाम १२.६०% + लँबडा सायलोहेतरीन ९.५% झेडसी (२.५ मिली/ १० लीटर पाणी ( साधा पंप) या किटनाशकाचा वापर करावा.


 

काढणी व मळणी :- शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी. कापणी नंतर पिकाचे छोटे-छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी व बियाण्याच्या बाह्य आवरणाला ईजा पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे. मळणी करतांना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०0 ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर गती ३०0 ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. साधारणतः उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याच्या रंग पिवळसर हिरवट असतो.

साठवण : मळणी नंतर बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के पर्यंत आणावे. बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी. साठवणीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे. साठवण करतांना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये.

उत्पादन: शेतकरी मित्रांनो,उन्हाळी सोयाबीन चे एकरी ३ ते ५ क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.परंतु योग्य नियोजनाद्वारे आपल्या बर्‍याच शेतकरी बांधवांनी ८-१० क्विंटल एकरी उत्पादन ही घेतलेले आहे. त्यामुळे आपण ही योग्य नियोजनाद्वारे उन्हाळी सोयाबीन पेरणी करून पुढील खरीप हंगामाकरिता दर्जेदार बियाणे उपलब्ध करू शकतो.


Blogger द्वारे प्रायोजित.