|
होय आम्ही पण कष्टकरी | Yes, We are also Hard Workers | मराठी लेख |
|
दररोज आपल्या
संसाराचा गाडा या शेतातून त्या शेतात, या वाटेकडून त्या वाटेकडे किंबहुना या गावातून दुसर्या
गावात फिरणारे व आपली दररोजची भूक भागवून मुक्या प्राण्याची भूक भागवणारा मी एक
कष्टकरी….
होय, कदाचित
तुम्ही ओळखले मला, मी तोच… म्हणजे
मेंढपाळ.
कधी कधी सह्याद्रीच्या
कड्या कपारीतून जात असतो तर कधी पठारावर विसावतो.. आयुष्यभर बैलगाडीत माझा संसार
थाटून मी फिरस्ती असतो या रानातून त्या
रानात, जिथे माझ्या
मुक्या प्राण्याला खायला भेटेल तिथे तिथे असतो मी. माझा संसार काही मोठा नाही दोन
बैल, सोबतीला 1 घोडी असते नेहमी, हे दोनच प्राणी माझ्या संसाराची ने आण करत
असता. बायकोच्या संसारात दोन तीन पांघरायला कपडे, दोन चार मीठ मिरचीच्या बरण्या, एक दोन पातील आणि जिथे जाईल तीन दगडाची एक चूल
बनवली की झाला स्वयंपाक. पाणी आणायला कधी नदीवर, कधी विहिरीवर तर कधी मालकाच्या ईथे जात असते ती
मग ते कितीही दूर असो कधीही आपल्या धन्याला एकमात्र तक्रार नाही. सोबतीला नेहमी एक
दोन रखवालदार खंड्या, राजा असतच आमच्या
की ज्यांच्या वर विश्वास ठेवून रात्रीचा थोडा फार डोळा लागतो. त्यात बरोबर लहान
सहान मूल असल कि त्या लेकराकडे बघत आणि दिवसभर काम करून आमची दैनंदिनी चालू असते.
दररोज आपल्या
मुक्या लेकरासाठी वेगवेगळ्या मालकाच्या बांधावर चक्कर घालावे लागतात. कुणी तरी हो
म्हंटल की जीवाला कस बर वाटत. त्यात दिवस ते पावसाळ्याचे एक प्रकारे खूप सुखाचे ही
आणि कष्टदायी पण. आता सुखाचे म्हणाल तर ते अस की सगळीकडेच गवत उगवत म्हणजे मुक्या
जीवाची सोय होते 2-3 महिन्याची आणि
दुःख यात की बिचार्या प्राण्यांना कधि निवाऱ्याची सोय नसते. परिणामी कधी कधी
संपुर्ण रात्र झोपडीत बसुन आम्हाला काढावी लागते तर बिचारी प्राणी भर पावसात उभे
असतात रात्रभर.
कधी वादळ वारा आला तर जिवाला धास्ती उभी राहती मग एकच पर्याय असतो
परमेश्वराला नतमस्तक होऊन विघ्न टळू दे रे बाबा एवढेच म्हणणे. कधी कधी कोणाला दया
आली तर देता आम्हाला रहायला जागा त्यांच्या चाळीमध्ये किंवा पत्र्याच्या शेडमध्ये
त्या वेळेस जीव जसा सुखावून जातो. पण ज्यावेळी पूर्णपणे रानात असतो त्यावेळेस
आम्हालाच संकटाला दोन हात करावे लागतात. रानावनात फिरत आयुष्याचे दिवस जात असतात
कधी सुखाचा तर कधी दुःखाचा… शेवटी आम्ही पण एक कष्टकरी आणि समाजाचा एक घटक.
लेखण:
श्री. एन. के. पगार,
मंडळ कृषि अधिकारी,
कृषि विभाग, महाराष्ट्र
Read more